खाशाबा जाधव यांचा जन्म साताऱ्यातील गोळेश्वर या गावी 15 जानेवारी 1926 साली झाला. केडी या टोपण नावाने ते ओळखले जात. खाशाबा जाधव यांचे वडील कुस्तीचे वस्ताद होते. खाशाबा जाधव यांनी त्यांच्या वयाच्या 8 व्या वर्षी गावातील प्रसिद्ध कुस्तीपटूला अल्पावधीत लोळविले होते. खाशाबा यांनी वयाच्या 5 व्या वर्षापासूनच वडीलांकडून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले.त्यांना लहान वयापासूनच कुस्तीची आवड होती.
इ.सन 1940-1947 या कालावधी मध्ये खाशाबांनी टिळक हायस्कूल, कराड, जि. सातारा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. खाशाबा के कुस्तीमध्ये तरबेज झाले होते. खाशाबा यांच्या म्हणण्यानुसार 1952 च्या ऑल्मपिक खेळासाठी मद्रास येथील राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये त्यांना हेतूपुरस्सर गुण कमी दिल्याने त्यांची निवड झाली नाही. असा आरोप झाला. तेव्हा त्यांनी यासाठी पतियाळाच्या तत्कालीन महाराजांकडे दाद मागितली. पतियाळांच्या महाराजांना खेळामध्ये आवड होती. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरत त्यांना मदत करण्याचे ठरवले. महाराजांनी खाशाबांची कुस्ती विरोधी खेळाडू सोबत पुन्हा घेतली. यावेळी खाशाबांनी विरोधी खेळाडूस हरवले आणि खाशाबांची हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑल्मपिक स्पर्धेसाठी निवड झाली.
खाशाबा यांची हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑल्मपिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर खाशाबा यांना हेलसिंकी येथे जाण्यासाठी निधीची आवश्यकता होती. गावामध्ये लोकवर्गणी करण्यात आली.राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. खर्डेकर यांनी स्वतः चा विद्यार्थी ऑल्मपिक स्पर्धेसाठी जात असल्याने स्वतःचे घर कोल्हापूरच्या मराठा बँकेकडे गहाण ठेऊन खाशाबा यांना 7000 रु. ची मदत दिली. तत्कालीन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील खाशाबाला याकामी 4000 रु. दिले.
ऑल्मपिकमध्ये खेळत असतांना खाशाबा यांच्या गटामध्ये विविध देशांचे 24 स्पर्धक होते. खाशाबा यांनी मेक्सिको, जर्मनी, कॅनडा या देशांच्या विविध स्पर्धकांसोबत कुस्ती जिंकली उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. शेवटी खाशाबा जाधव यांनी 52 किलो वजनगटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात ब्राँझ पदक पटकावले आणि हेच पारीतोषिक स्वतंत्र भारताला वैयक्तिक पातळीवर मिळालेले प्रथम पारितोषिक ठरले. यावेळी जपानच्या इशी शोभ याने कुस्ती मध्ये सुवर्णपदक पटकावले.
ऑल्मपिक स्पर्धेत ब्राँझपदक मिळाल्यानंतर जेव्हां खाशाबा जाधव गोळेश्वर, ता. कराड, जि. सातारा या आपल्या छोटयाशी गावी परत आले. त्यावेळी कराड रेल्वेस्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी 151 बैलगाड्या सजवून हजारो गावकरी हार, फुले, ढोल ताशे घेऊन थांबले होते. लोक लेझीम पथक, फटाके घेऊन आपल्या लाडक्या खेळाडूचे स्वागत करण्यास उत्सुक होते, जेव्हां खाशाबा जाधव हे रेल्वेस्थानकावर आले तेव्हा 15 मिनिटे पायी चालण्याच्या अंतरास पार करण्यासाठी सुमारे सात तास लागले यावरून त्यांच्या प्रती असणारे लोकांचे प्रेम निदर्शनास येते. गावकर्यांनी केलेले स्वागत पाहून खाशाबा जाधव यांचे कुटूंब भारावून गेले. पायी चालण्यास 15 मिनिटे वेळ लागतो त्याठिकाणी सात तास वेळ लागला. हा प्रकार मी कधीही पाहिला नाही. असे उद्गार त्यांचे बंधु संपतराव जाधव यांनी काढले. खाशाबा जाधव यांच्यामुळे गोळेश्वर गावाची जगभर प्रसिद्धी झाली.
कोल्हापूर मधील सर्व तालमीच्या आखाड्यांनी तसेच विविध महाविद्यालयांनी खाशाबा जाधव यांचे भरभरुन कौतूक केले. खाशाबा जाधव यांनी स्वतः कुस्ती फडाचे आयोजन केले. त्यामध्ये स्वतः भाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या. त्यांना मिळालेल्या उत्पन्नातून शिक्षकांनी केलेल्या मदतीची त्यांनी परतफेड केली.
पुढे 1955 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर भरती झाले, आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. सोबतच त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खेळाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहीले. हे करत असतानांच त्यांनी पोलीस दलात 27 वर्ष सेवा केली व शेवटी ते सहायक पोलीस आयुक्त म्हणून या पदावरून पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले.
2001 मध्ये त्यांना खेळातील प्रसिद्ध असा अर्जुन अवार्डही मिळाला. ऑल्मपिक पदक विजेत्या खेळाचा सन्मान म्हणून 2010 मध्ये इंदिरा गांधी स्पोर्टस कॉम्पलेक्स मधील कुस्ती विभागाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात आले. अशा खेळाडूच्या खेळातून प्रेरणा घेऊन आपणही क्रिडा क्षेत्रात नाव करु शकतो, असे विचार मनात आल्याशिवाय राहात नाहीत.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.