Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा

चला तर मित्रांनो, आज आपण Marathi Bodh Katha  पाहणार आहोत.कथा सर्वांनाच आवडतात परंतु कथेमधून चांगला बोध निघाला तर त्या कथा वाचायला आणि अनुकरण करायला निश्चितच चांगले असतात आणि म्हणूनच आज आपण ज्या कथा पाहणार आहोत त्यातून निश्चितच चांगला बोध निघतो आणि याचा उपयोग आपल्याला आपले संस्कार घडवण्यासाठी निश्चितच होतो.

आज आपण ज्या मराठी बोधकथा पाहणार आहोत त्या बोधकथा संस्कारक्षम तसेच चांगला माणूस घडविणाऱ्या कथा आहेत मला माहित आहे. तुम्ही या कथा निश्चित वाचाल आणि त्याप्रमाणे अनुकरण कराल व आपले जीवन संस्कारक्षम बनवाल.

बुद्धीला व्यवहाराची जोड हवी 

 
 पाणीनी हे संस्कृतचे महान व्याकरण कार. 2000 वर्षांपूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्ती विषयी शिकवीत होते त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले पण व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यात ते गडून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती  सुचलीही. व्या जिघ्रती इती व्याघ्रः’
म्हणजे वास घेत चालतो तो वाघ ……पण झाले काय वाघाने त्यांचीच शिकार केली.

 

तात्पर्यः या ठीकाणी
फक्त बुध्दी असून चालत नाही, त्याला व्यवहाराची सांगड घालावी लागते.

 उपकार स्मरावे

अज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे ?  चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.

तात्पर्यः उपकाराची जाण ठेवावी

 विद्येची किंमत

एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी
शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर
पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला
म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली
आहे.
शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले,” त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा आहे.” शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला मनाला,” पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन.”  ‘रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं
तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले,
‘नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतिराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या
फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत. नाही तिची किंमत शून्य
आहे.

 तात्पर्यः  माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग
करून द्यावा

 

गर्वाचे घर खाली

भीम हा सर्वात बलशाली पांडव.
त्याला आपल्या बाहुबलाचा गर्व झाला होता. एकदा काय झालं, खांद्यावर गदा टाकून तो ऍटीत
चालला होता. वाटेल त्याला एक म्हातारा वानर दिसला. त्याची लांब शेपूट वाटेवर आडवी पसरली
होती. भीम म्हणाला, “अरे तुझं शेपूट आखडून घे. वाटेत काय पसरून बसला आहेस?”  वानर नम्रतेने म्हणाले, “मला म्हातार्‍याला ते उचलत नाही. फार लांबलचक आहे ना. तूच उचलून ठेव ना
बाबा.”  भीम ते उचलू
लागला तर ते उचलेचना . गदा घालून प्रयत्न केला तरी हलेना. भिमाची दमचाक झाली. त्याने
वानराची  क्षमा मागितली व म्हणाला, “तू खरा कोण आहेस ? सांग. मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता.”  मी पुन्हा गर्व करणार नाही.
वानराने आपले खरे रूप प्रकट केले. तो होता प्रत्यक्ष महापराक्रमी राम भक्त हनुमान!

 

तात्पर्यः गर्व कधी ही करू नये

एकमेका सहाय्य करू

लोक उद्योगी झाल्याशिवाय
राष्ट्राचा विकास होत नाही . राजा विलक्षण प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे. पण प्रजा
आळशी असल्यामुळे तो चिंतित होता. दरबारातल्या वयोवृद्धांना त्याने विचारले काय करावे
म्हणजे प्रजा कार्यप्रवण होईल? तेव्हा एका वृद्धाने सांगितले त्याप्रमाणे त्याने केले.

गजबजलेल्या रस्त्यात एक
मोठा दगड ठेवला . जाणारे येणारे दगडाच्या बाजूने जाऊ लागले व दगड ठेवणाऱ्याची निंदा
करू लागले. पण दगड हलवण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. काही दिवसांनी एक माणूस त्या
मार्गाने चालला होता. कोणालाही नावे न ठेवता त्याने खूप खटपटीने दगड हलवला. सर्वांची
अडचण दूर झाली.

राजाने दरबारात त्याचा सत्कार
केला. खूप लोक जमले होते राजा मनाला, “पहा याचे उदाहरण. मी राजा खरा, पण लोकांच्या सहाय्यखेरीज,
कष्टा खेरीज मी एकटा राज्य वैभवशाली करू शकणार नाही.” आजही आपण अशाच प्रसंगातून जातो आहोत नाही का ?

 तात्पर्यः एकमेकांना मदत केली तर कामे
सोपी होतात.

निरीक्षण

वैद्यकीय महाविद्यालयातील
प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची
क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हणाले, “या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार
आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे. तिटकारा दर्शवायचा नाही.

सरांनी वाटीत बोट बुडवून
चाखले. पाठोपाठ एका मागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चेनेच चाखले.

 प्राध्यापक म्हणाले, “किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पास झालात, पण सूक्ष्मनिरीक्षणाच्या
गुणात सगळेच फसलात.”

‘मी करतो तसे तुम्ही करायचे
होते. तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही, मी एक बोट वाटीत बुडवले व चाखले दुसरेच.’

 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव
पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले.  म्हणाले , ‘या पाण्यात अपायकारक काहीच नाही !’ आता
विद्यार्थी खुष झाले.
 

तात्पर्यः प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमन
पटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो.

प्रसंगाचे भान ठेवावे

एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?”  त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.

तात्पर्यः समाजात वागत
असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.

खरा शिष्य कोण?

एकदा दोन तरुण स्वामी
विवेकानंदाकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी स्वामीजींना
सांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार – कंटाळले
– पण एकजन स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष देई, “तुमच्यात माणुसकी नाही
तुम्ही कठोर आहात” वगैरे. पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचे
शिष्य होण्यास योग्य आहोत.

 एक जण रोज पूजा करी दुसरा दोष देई. एक दिवस नदीला
पूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा -स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोष
देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे तीन दिवस चालले. चौथ्या
दिवशी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणून
स्वीकारले. ते म्हणाले, “शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो. निष्ठा
हवी. तामसी वृत्ती बदलता येईल. पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल.”

तात्पर्यः कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे.

शास्त्राचा उपयोग कोणता?

प्राचीन भारतात नागार्जुन
नावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती.
दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणा ना – आचार्यांनी दोघात एक पदार्थ
दिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे
उत्साहाने कामाला लागले. 

तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, ‘कामात काही अडचणी
तर आल्या नाहीत?’ पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता वडील पोटदुखींना हैराण झाले
होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन
करून आणल आहे.” दुसरा म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध
रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यात
वेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.
आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, ‘रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?’

 तात्पर्यः ज्ञानाचा/शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.

गरज सरो आणि वैद्य मरो

 
वैशाख महिना. दोघे प्रवासी प्रवास करीत होते. सूर्य वर येऊ लागला तस तसा त्रास वाढत चालला. त्या रणरणत्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागले. उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले. थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी आतुर झाले. दूरवर त्यांना एक झाड दिसलं, पानांनी गच्च भरलेलं त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढविला. थंडगार
सावलीत बैठक मारली. थोड्या वेळाने ते तेथेच आडवे झाले.
जागे झाले तोवर ऊन उतरल होत. उठून बसले. एकाच लक्ष वर झाडाकडे गेल म्हणू लागला “अरे,केवढं मोठं आहे हे झाड पण काय कामाचं? ना फूल ना फळ. अगदी निरुपयोगी आहे हे.” दुसऱ्यांने त्याचीच री ओढली. म्हणाला, “असलं झाड कोणा मूर्खाने लावलं कोणास ठाऊक, तोडून टाकण्याच्या लायकीचा आहे हे.” त्याचं बोलणं ऐकून झाडाला राग आला त्याची पान जोरात सळसळू लागली. झाड म्हणाल, “मुर्खांनो,एन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात. माझ्या आश्रयाला आलात मी थंडगार सावली दिली. ते इतक्यात विसरलात आणि माझ्या जीवावर उठता काय? मी नसतो तर तुमचं काय झालं असतं?” प्रवासी वरमले त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला.

तात्पर्यः आपल्याला मदत
हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला गरज संपली की त्याला 
लाथाडायचं हे चालत नाही.

संपत्तीचा खरा उपयोग

Marathi bodh katha

धीरोदात्त वीर

Marathi Bodh katha 12

बालकाचे प्रसंगावधान

Marathi Bodh Katha 13

विचारी अमोल

काळा, बावळा वाटणारा, रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला अमोल खुषीत होता. आज त्याला मोठ्या पाहुण्याच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती. त्या रकमेत आठवीची पुस्तकं, वह्या, फी सारा खर्च भागेल का याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोचला, त्याचं त्यालाच कळलं नाही. मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षिसे घेणाऱ्या मुलांच्या गटात नेऊन बसविलं. समारंभ सुरू झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यंदा बक्षिसं देण्यासाठी मगनशेठनी मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं. त्याचं औदार्य, व्यवसाय, सगळं सांगितले. मुलांची चुळबूळ सुरू झाली. म्हणून आवरतं घेतलं.
बक्षिसांची यादी वाचली जाऊ लागली. मुलं क्रमाने बक्षीस घेऊ लागली. अमोलचं नाव पुकारलं गेलं. त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणाऱ्या बक्षीसासह ५-६ बक्षिसे मिळाल्याचं सांगितलं अमोल व्यासपीठाकडे जाऊ लागला. मित्रांच्या टाळ्या सुरू झाल्या. पाहुण्यांकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनिवर्धक पुढे ओढला. म्हणाला “ही सर्व बक्षिसं मिळाल्यानं मला खूप आनंद झालयं. पण…. मगनशेठनी पैसा मिळविलाय ‘गुटखा’ विकून. त्यांच्या मुलानं माझा मित्र सुहासच्या भावाला गुटख्याची सवय लावली. जिभेचा कर्करोग झाला त्याला. त्यातच तो गेला. गुटखा वाईट असतो. मुलांना त्याची सवय लावणारे, तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात. गुटख्यावर मिळविलेल्या पैशाचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मला माफ करा.” सगळे स्तब्ध झाले. अमोल परतला. पण पाहुण्यांनी त्याला परत बोलावले. शाबासकी दिली. ‘अमोल हिरा’ असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून ५०० रुपये बक्षीस दिले.
तात्पर्यः मुलांना, ‘अमोलसारखे विचारी व्हा’ असा संदेश दिला. टाळ्यांच्या गजरात मुलांनी सद्विचारी होऊ असे आश्वासन दिले.

सत्यवचनी चोर

Marathi Bodh Katha 15

सारे काही माझेच ?

एक बहुश्रुत कीर्तनकार होते. निरनिराळी वचने, दाखले देऊन, गोष्टी सांगून कीर्तन खुलवायचे. लोकही रंगून जायचे, कीर्तनाला गर्दी करायचे.हरिदासबुवांची खूप स्तुती करायचे.
            एकदा ह्या कीर्तनकाराला एक गावी त्यांचा जुना वर्गमित्र भेटला. त्यांनी त्याला आपल्या निवासस्थानी बोलाविले.आगत स्वागत केले व म्हणाले, “अरे, एकदा माझ्या कीर्तनाला ये ना, लोक माझी खूप स्तुती करतात. पहा तर एकदा ” मित्रानं मान्य केलं. रात्री तो कीर्तनाला गेला. कीर्तनकार रंगात आले. एकेक वचने सांगू लागले. नवा श्रोता मित्रत्वाच्या नात्याने पुढेचबसला होता. बुवांच्या एकेक वचनावर अभिप्राय देऊ लागला. “हे तर शंकराचार्यांनी म्हटलंय, हे रामदासांचे वचन, हे ज्ञानेश्वरीत सांगितलेय आणि हे तर एका इंग्रजी वचनाचं भाषांतर आहे.” बुवा चिडून म्हणाले, ‘अरे मूर्खाप्रमाणे सारखा अडथळा आणू नकोस.’लगेच मित्र उद्गारला, ‘हे मात्र तुमचे स्वतःच वाक्य आहे हं !’
लेखक, वक्ते, राजकारणी अनेक वचने स्वत:चीच असल्यासारखी सांगत असतात. पण अहंकार बरा नव्हे.

फळ्याचे महत्त्व

मध्य प्रदेशातील बस्तर जिल्हा फार मागासलेला आहे. आदिवासींची वस्ती तेथे जास्त आहे. अशा भागात “श्री शिवानंद” नावाचा आश्रम आहे. तेथे श्री सदाप्रेमानंदसरस्वती नावाचे तत्त्वनिष्ठ स्वामी मुलांना, मोठ्यांना शिकवीत. त्यांच्यामुळे तेथील लोकांवर चांगले संस्कार झाले.
तेथील शाळा पहाण्यास एकदा त्या विभागाचे कमिशनर आले. शाळेचे कार्य पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी स्वामीजींना म्हटले, “या आश्रमाला काय साहाय्य करू?” स्वामीजींनी मागितला एक फळा. कमिशनरांना मोठे आश्चर्य वाटले. “एवढेच ? ही तर अत्यंत किरकोळ गोष्ट झाली. अधिक काहीतरी मागा.” स्वामीजी मंदपणे हसून म्हणाले, “माझी ही मागणी फार क्षुल्लक वाटते काय ? अहो, या फळ्यावर लिहून, त्यावरून वाचूनच ना तुम्ही मोठे झालाय, कमिशनर झाला, नाही का ?’
स्वामींच्या प्रश्नानें कमिशनर प्रभावित झाले. त्यांनी शाळेला उपयुक्त वस्तू व बरीच सुंदर पुस्तके भेट म्हणून दिली.

ऑलिम्पिक पदक विजेते 

अध्यात्म आणि व्यवहार.

एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्याबरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही. खट्याळ, तरुण शिष्यही होते. त्यातील एकजण धाडस करून त्यांना म्हणाला, “तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळताहात ?’

शंकराचार्य लगेच म्हणाले, “पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे ?” तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली.

होतं काय की, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये.

कामाचा दर्जा

संजय आणि त्याचे मित्र त्यांची वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या सदुकाकांशी गाढ मैत्री होती. आज अभिजीत वगळता सगळे खुषीत होते. काका म्हणाले, ‘अरे अभिजित, तू का गप्प गप्प, परवाची तुझी मुलाखत ठीक झाली ना ? अभिजित काहीच बोलेना. काकांनी फारच आग्रह धरल्यानं सुजितने अभिजितच्या हातातल पत्र काकांना दिलं ते म्हणाले, “अरे कायमची नोकरी मिळूनही तू रडतोस कसला? अभिजितला नोकरी मिळाली, पण चतुर्थ श्रेणीची म्हणून तो नाराज होता. काकांनी त्याला विचारले, “किती लोक मुलाखतीला होते रे ?” “चारशे”, अभिजित.’जागा किती होत्या ?” काका “तीस”. तुझ्यात काही विशेष आहे म्हणून तर चारशेतून तुझी निवड झाली. प्रयत्न करून उन्नतीकरणं आपल्या हातात असतं. योग्य वेळी सर्व काही मिळत. निराश न होता वर जाण्याची जिद्द बाळग. प्रामाणिक प्रयत्नांनी तू निश्चित ध्येय गाठशील. खऱ्या अर्थाने यशस्वी होशील.कोणतेही काम उच्च किंवा नीच नसतं. काम करण्याची. पद्धत, हेतू, वृत्ती ही उच्च नीच असतात. उच्चपदस्थ भरपूर पगार घेऊनही लाचलुचपत करीत असेल तर ? उच्च हेतून कर्तव्य करणं हीच खरी देशसेवा असते. “ऊठ, उद्या कामावर हजर हो. ”

शपथ

कोकणातले लोक देवभोळे, श्रद्धावान खऱ्या खोट्याचा निर्णय देवळात लावणारे, देवापुढे शपथ घेऊन कोणी खोटे बोलू शकणार नाही असा विश्वास बाळगणारे त्या विश्वासास जागणारे.
कोकणातल्या एका शेतकऱ्याची अवजारे गेली. शेतकऱ्याला वाटत होतं. ती चोरली शेतकामावर येणाऱ्या मजुरांनीच. पण चोरी केल्याचं कोणीच कबूल करीत नव्हतं. शेवटी देवळात देवासमोर शपथेवर तसं प्रत्येकानं सांगावं असं गावकऱ्यांनी ठरविलं. शेजारच्या गावात जागृत देवस्थान होतं. तिथं जाऊन शपथ घेण्याचा निर्णय सगळ्यांना मान्य झाला.
प्रमुख गावकऱ्यांसह शेतकरी शेतकामगारांना घेऊन शेजारच्या गावात पोचला. त्यांना दवंडी पिटलेली ऐकू येऊ लागली. जवळ गेल्यावर सगळं स्पष्ट ऐकू आलं.
‘एकाऽ हो ऐका, आपल्या गावातल्या देवळातील सुप्रसिद्ध घंटा चोरीला गेली आहे. जो कुणी चोर पकडून देईल, चोरी कुणी केली सांगेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल.
दवंडी ऐकून शहाणा शेतकरी बरोबरच्या लोकांना म्हणाला, आपण इथूनच परतू. देवासमोरची घंटा चोरीला गेली. तिचा शोध लागत नाही. चोर सापडत नाही. मग माझी अवजारं चोरणाऱ्या चोराचा पत्ता कसा लागणार ?
देवावर कितीही श्रद्धा असली तरी आपले प्रश्न सोडविण्यात अंधश्रद्धा उपयोगी पडत नाहीच.

देशप्रेम

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आझाद हिंद सेना स्थापन केली. सेनेच्या खर्चासाठी देणग्या देण्याचे आवाहन जनतेला केले. त्या आवाहनाला जनतेने मुक्त प्रतिसाद दिला. नेताजींच्या प्रत्येक सभेत नोटाचा ढीग जमत असे. अनेक स्त्रिया अंगावरचे दागिने काढून ते निधीत टाकत.
अशीच एक सभा संपल्यानंतर एक वृद्ध स्त्री काठीच्या साह्याने चालत सुभाषबाबूंच्या जवळ आली. नमस्कार करून तिने ४/५ रुपयांच्या चुरगाळलेल्या नोटा सुभाषबाबुंच्या हातात दिल्या. म्हणाली, ‘लेकरा, माझी ही सर्व शिल्लक तुझ्या सेनेसाठी घे, मी म्हातारी इतकंच देऊ शकते ! सुभाष बाबूंना त्या म्हातारीचं औदार्य बघून भरून आले. ते म्हणाले, “माते, मी हे पैसे घेणार नाही, ते तुझ्याकडे ठेव. तुलाच त्याची जास्त गरज आहे. “
वृद्धेने ते घ्यायचे नाकारले. म्हणाली, “मला माझ्या देशासाठी इतकं तरी करायची संधी हवी. “
नेताजींनी तिला नमस्कार केला. त्यांची खात्री पटली की, ज्या देशातील माणसं इतकी देशभक्त आहेत, तो देश जास्त दिवस पारतंत्र्यात राहूच शकणार नाही.

संपत्तीचा उपयोग

Marathi Bodh katha 22

अशक्य शब्द मूर्खाच्या शब्दकोशात

“माझे आजोबा खूप मोठे जहागीरदार होते.”
“माझ्या पणजोबांनी लढाईत मोठा पराक्रम गाजवला.’ लष्करातील एका पदाधिकाऱ्याच्या जागेसाठी मुलाखती घेणे चालू होते. प्रत्येक उमेदवार त्याच्या घराण्याची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सांगत होता. आता एक शेवटचा उमेदवार उरला, त्याच्यावर मुलाखत घेणाऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार सुरू होताच त्याने प्रामाणिकपणे सांगितले, “माझे घराणे किती मोठे आहे, मला माहीत नाही. आमच्या पूर्वजांनी काय पराक्रम जागवला मला सांगता येणार नाही. पण एकच सांगतो, मा झ्या घराण्याचे कर्तृत्व सिद्ध करण्याची सुरुवात माझ्यापासून होणार आहे.” या उमेदवाराच्या बोलण्यातील तडफदारपणा आणि आत्मविश्वास पाहून त्याची त्या पदासाठी निवड झाली. आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकू पाहणाऱ्या या उमेदवाराचे नाव आहे नेपोलियन बोनापार्ट.
एवादी गोष्ट करणे अशक्य आहे असे कोणी म्हटले की तो हट्टाने ती करून दाखवत असे. “अशक्य हा शब्द मूर्खाच्या शब्दकोशातील आहे.” हे त्याचे विधान दैववाद्यांना आव्हान देणारे ठरले. प्रयत्नवादी माणसे काहीशी हट्टी आणि हेकेखोर असतात. त्याच्या या हट्टाला योग्य दिशा देण्याचे काम आईने केले. शाळेमध्ये रोम आणि कार्थेज यांच्यातील लुटुपुटुची लढाई हा खेळ मुले खेळत होती. इतिहासकाळात घडून गेलेल्या या लढाईत रोमचा संघ विजयी झाला होता है। नेपोलियनला माहीत होते. मला विजेत्या रोमच्या संघाचे नेतृत्व करायचे आहे असा हट्ट तो धरून बसला. त्याच्या हट्टापुढे बाकीच्या मुलांना नमते घ्यावे लागले. ही लुटुपुटुची लढाई नेपोलियनच्या नेतृत्वाखाली रोमने जिंकली. विजयी वीराच्या थाटात तो घरी आला. आई आपल्याला खूप शाबासकी देईल अशी त्याची समजूत. आईच्या कानावर प्रत्यक्षात काय झाले हे सारे गेले होते. तिने त्याची कानउघडणी केली. “तू विजयी झालास याचा मला आनंद आहे, पण तू ज्या प्रकारचा हट्ट धरलास तो मला मान्य नाही. या लढाईत विजयी संघ कोण हे तुला माहीत होते. तू विजेत्या गटाचे नेतृत्व केलेस आणि विजय मिळविलास यात कसली आली मर्दुमकी? ज्या लढायांचा अजून निर्णय लागायचा आहे अशा लढाईत भाग घ्यायची वेळ आली तर तू काय करशील? जय आणि पराजय कोणत्या झेंड्याखाली किंवा कोणत्या गटाकडून आपण खेळतो यावर अवलंबून नसतो. हट्ट धरायचाच असेल तर असा धर की ज्या गटाचे मी नेतृत्व करीन तो विजयीच होणार.” आईच्या शब्दांनी नेपोलियनला आत्मशोध घेण्याची प्रेरणा मिळाली. सतत विजयी होणे हाच त्याने आयुष्यभर ध्यास घेतला. विजय मिळवण्यासाठी काय काय डावपेच लढवायचे याच विचारात तो सदैव मग्र असायचा. प्रतिपक्षाकडे भरपूर सैन्य असेल तर अशा प्रसंगी शत्रूवर मात कशी करायची? शत्रूने कोंडीत पकडलं तर कसे निसटून जायचे? प्रतिपक्षाचा डाव त्याच्यावरच कसा उलटवायचा? या सान्या गोष्टी त्याने प्रत्यक्षात कागदोपत्री आखलेल्या आराखड्याप्रमाणे करून दाखवल्या. प्रतिकूल परिस्थिताचे अनुकूलतेत रूपांतर करणारा महत्त्वाकांक्षी युद्धनेता म्हणून सारे जग नेपोलियनला ओळखते.

 गुरुदक्षिणा

फार पूर्वी आश्रमात गुरूजवळ राहून गुरूची आणि गुरू पत्नीची सेवा करून, त्यांचे जीवन जवळून पाहून विद्येसाठी तपश्चर्या करण्याचा तो काळ होता. विद्येचा विक्रय करणं हे त्या काळात पाप समजले जाई. असाच तक्षशिला येथील आयुर्वेदाचार्य आत्रेय गुरुजींचा आश्रम. राजपुत्रांपासून ते सामान्य दासीपुत्र आणि भिल्लकुमारांपर्यंत अनेक प्रकारचे शिष्य त्यांच्याकडे शिकून जात. शिक्षण संपवून आश्रम सोडून जाताना विद्यार्थी स्वेच्छेने काही गुरुदक्षिणा देत. त्या दिवसाची अशीच ती प्रसन्न सकाळ. गुरुजींचा निरोप घेताना विद्यार्थी गुरूदक्षिणा देत आणि गुरुजी त्यांना तोंडभरून आशीर्वाद देत. असे करता करता गुरुजींचे लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेले. एका कोपऱ्यात तो उदासवाणा होऊन गुरुजींकडे पाहात होता… गुरुजींनी त्याला जवळ घेतले आणि विचारले, “काय रे बाळ, तू असा उदास का? कसल्या एवढ्या विचारात गढून गेलास ?” “गुरुजी सगळ्यांनी काही ना काही तरी गुरुदक्षिणा दिली. पण मी इतका सामान्य आहे. गुरूदक्षिणा देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही.” त्या विद्यार्थ्याच्या बोलण्यात बरेच तथ्य होते. तो होता बिंबिसार राजाला राजगणिकेपासून झालेला मुलगा. लहानपणापासूनच रानावनात सोडून दिलेला. पण राजाच्या एका दासीपुत्राने त्याला आश्रय दिला, त्याला लहानाचा मोठा केला आणि नंतर तो गुरुजींकडे शिक्षणासाठी आला. गुरुजींना हे सारे माहीत होते. विद्यार्थ्याच्या पाठीवरून हात फिरवून ते म्हणाले, “अरे मी तुझी परिस्थिती जाणतो. तू ज्ञानासाठी तपश्चर्या अखंडपणे चालू ठेव. हीच माझी गुरुदक्षिणा.” पण तो विद्यार्थी ऐकेना. काहीतरी गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय मनाचे समाधान होणार नाही असे त्याचे म्हणणे. शेवटी गुरुजींनी आज्ञा केली, “ज्याचा जगाला काहीही उपयोग नाही अशा झाडाची चार पानं मला गुरुदक्षिणा म्हणून आणून दे.”
गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून तो विद्यार्थी गुरुदक्षिणेच्या शोधात निघाला. गावोगावी, रानावनातून, जंगलातून, दऱ्याखोऱ्यातून खूप भटकला. कोणतेही झाड दिसले की या झाडाचा उपयोग काही आहे का? याचा त्याने शोध घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला रोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या तुळस, बेल, कोरफड, कडुनिंब, दुर्वा, नारळ, आंबा अशा वनस्पती झाल्या. निरनिराळ्या प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे झाली. त्याच्या लक्षात आले की काही वनस्पतींचा औषधासाठी उपयोग होऊ शकतो, काही वनस्पतींचा एकापेक्षा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. हजारो प्रकारच्या झाडांचा त्याने अभ्यास केला. हे काम जवळ जवळ तीन वर्षेपर्यंत चालू होते. या तीन वर्षात जमवलेल्या माहितीचे भले मोठे बाड जमा झाले. थकला बिचारा. पण गुरुजींना हवी तशी वनस्पती मिळाली नाही. निराश मनानं तो गुरुजींकडे आला आणि हताशपणाने झाला प्रकार सांगितला. गुरुजी प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, “अरे जगामध्ये निरुपयोगी असं एकही झाड नाही हे का मला माहीत नव्हतं? माझी आज्ञा तू प्रमाण मानलीस. मला माझी गुरुदक्षिणा मिळाली.” अशी अलौकिक गुरुदक्षिणा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे नाव जीवक. आयुर्वेदातील तो एक तज्ञ मानला जातो. शल्यचिकित्सेतही तो प्रवीण होता. गौतम बुद्धांचा तो निष्ठावान अनुयायी होता.

पित्याचे ऋण

“बाई, तुमची लाकडं फोडायची आहेत का? घराची कौलं शाकारायचीत का? मला सांगा काम. चार पैसे मिळून जातील.” शाळेत जाणारा हा तेरा वर्षाचा मुलगा शाळेचा अभ्यास सोडून गावात घरोघरी जाऊन असली काम करायचा. शिकण्यापेक्षा त्याला अंगमेहेनतीची जास्त आवड. दुसऱ्यांची गुरं राखणं शेतात कामं करणं आणि एस. टी. स्टँडवर जाऊन हमाली करणे असले कोणतेही कष्टाचे काम असो ते करायची या मुलांची नेहमीच तयारी असायची. ही कष्टाची कामं करून आपण लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हे त्या मुलाचे स्वप्र. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य. पोटाला पुरेसे खायला नाही. अंगावर घालायला लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नाही. अशा परिस्थितीत अभ्यासात या मुलाचे मन कसे रमावे ? पण आपल्या मुलाने खूप शिकावे ही त्या मुलाच्या वडीलांची जिद्द.
                या मुलाचे वडील म्हणजे रामजीबाबा संकपाळ. माणूस मोठ्या खटपट्या, धीट प्रामाणिक आणि सरळ वृत्तीचा. तरुणपणी लष्करात नोकरी करून अंगच्या गुणांनी नाव मिळवलं. शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं, पण वाचनाची विलक्षण आवड. कुणी शिकवलं नाही तरी मोठी खटपट करून संस्कृत भाषेचा अभ्यास केला. मराठी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि गणित हा तर आवडीचा विषय. लष्करात सुभेदार म्हणून त्यांना बढती मिळाली, पण लष्करातील सैनिकांना आणि त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. लष्करातले मुख्याध्यापक म्हणूनच ते ओळखले जात. या पार्श्वभूमीवर मुलाने शाळेतील अभ्यास करायचा सोडून अंगमेहनत करून चार पैसे मिळवावेत हे त्यांना कसे पटावे? मुलाच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी ते सोडवायचे. त्याला शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे. मुंबईच्या जुन्या चाळीत रामजीबाबांचे बिऱ्हाड. स्वयंपाक, जेवण, अभ्यास, विश्रांती सारे काही एकाच खोलीत. खोलीत एकीकडे लाकडे आणि गोवऱ्या, तर दुसरीकडे भांड्यांची उतरंड, दळणाचं जातं, दुधासाठी बकरी हा सारा सरंजाम.
अशा या वातावरणात मुलाचा अभ्यास कसा व्हावा? अभ्यासासाठी थोडे निवांत वातावरण मिळायचे ते फक्त पहाटे, पण पहाटे अभ्यासाला मुलाला लवकर उठवायचे, तर घरात गजराचे घड्याळ नाही. मग रामजीबाबा रात्री २ पर्यंत स्वत:ची काही कामं करत जागत बसायचे, आणि मुलाला अभ्यासासाठी उठवून तिथेच कडेला स्वतः झोपायचे. मुलाला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तर त्यांनी विशेष खटपट केली. स्वतःच्या तुटपुंज्या मिळकतीत त्याच्या अभ्यासाची पुस्तके आणि आवडीची इतर पुस्तके हे सारे कसे जमावे? मग रामजीबाबा मुंडासं गुंडाळून थोरल्या मुलीकडे जायचे. तिच्याकडे पैसे नाही मिळाले तर मग धाकटीकडे जायचे. तिच्याकडे रोख पैसे नसले तर तिचा एखादा सोन्याचा दागिना मागून घ्यायचे. तो दागिना गहाण टाकून मारवाड्याकडून कर्ज काढायचे आणि पेन्शनचे पैसे आले की मारवाड्याचे पैसे देऊन दागिना सोडवून आणायचे आणि मुलीला परत करायचे. मुलाच्या शिक्षणासाठी केवढा आटापिटा ! अर्थातच वडील आपल्या शिक्षणासाठी किती धडपड करतात हे लक्षात आल्यावर त्या मुलातही जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. हळूहळू अभ्यासातही गोडी वाटू लागली. हा मुलगा स्वभावाने खूप जिद्दी होता.
पित्याचे आपला मुलगा खूप शिकावा हे स्वप्र पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने पुढील आयुष्यात विद्येसाठी कठोर तपश्चर्या केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बडोदा संस्थानाकडून शिष्यवृत्ती मिळवून परदेशात जाऊन शिक्षणाची एकामागून एक सर्वोच्च शिखरे सर केली. पण मुलाचे हे कौतुक पाहण्याचे भाग्य त्या प्रेमळ पित्याला लाभले नाही. अत्युच्य शिक्षण घेऊन सारे आयुष्य स्वतःच्या समाजाच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या या थोर सुपुत्राचे नाव, डॉ. भीमराव आंबेडकर.

 ससा आणि कासवाची शर्यत

ससा आणि कासव असे दोघे मित्र होते. सशाला वेगाने पळायला आवडे. कासव बिचारे सावकाश चाले. एकदा दोघांनी दूरच्या डोंगरावरील झाडास आधी कोण शिवतो? अशी पैज लावली. दोघेही निघाले. ससा पळत पुढे निघाला. कासव मात्र सावकाश चालत राहिले. थोडे अंतर गेल्यानंतर वाटेत एक हिरवेगार शेत लागले. त्यात गाजरे लावली होती. सशाने मागे वळून पाहिले, तर कासव खूप दूर होते. त्याने विचार केला, आपण तोपर्यंत गाजरे खाऊ फार तर कासव शेतापर्यंत येईल. मग आपण पुन्हा पळत पुढे जाऊ. सशाने गाजरे खावयास सुरुवात केली. अगदी पोटभर गाजरे खाल्ली. कासव अजूनही दूरच होते. सशास आता झोप येऊ लागली. त्याने विचार केला, आपण थोडी झोप घेऊ तोपर्यंत फार तर कासव शेताच्या थोडे पुढे जाईल; पण आपण ताजे तवाने होऊन जोरात पळू व शर्यत जिंकू. सशाने छान पैकी ताणून दिली. ससा झोपला. इकडे कासवाने ससा झोपला असल्याचे पाहिले पण ते थांबले नाही; तसेच चालत राहिले. थोड्या वेळाने सशास जाग आली पहातो तर काय ? कासव झाडाच्या अगदी जवळ होते. सशाने खूप जोरात धाव घेतली; पण तोपर्यंत कासव झाडापाशी पोचले देखील, अशा रितीने कासवाने शर्यत जिंकली.
बोध :- सावकाश आणि सतत काम केल्याने यश मिळते.

युक्तीवाण  कोंबडा

कोंडीबा आपल्या कुटुंबासहित बेलगावात रहात होता. तो कुक्कुटपालनाचा धंदा करीत होता; म्हणून त्याच्याकडे कोंबड्या होत्या, कोंबडे होते, गोजिरवाणी पिल्लंदेखील होती.
त्यांच्यापैकी एक कोंबडा जरा हटके होता ! आगळा-वेगळा होता ! तो कुकूच्चकू करून सांगायचा, “मी साहसी आहे, धाडसी आहे, हुशार आहे, युक्तिवाण आहे. होय, हटके आहे !”
अशा ह्या कोंबड्याला वाटले की, आपण आगळे-वेगळे साहस करावे. इथून निघावे, दूर जावे, नवा परिसर पहावा, वेगळी हवा अनुभवावी, नवे मित्र जोडावेत आणि मज्जाच मजा करावी.
त्याने आपला हा विचार सर्वांपुढे मांडला; पण एकाही कोंबडीला किंवा कोंबड्याला किंवा पिल्लाला तो पटला नाही. प्रत्येकाचे एकच म्हणणे, “तू आगळा-वेगळा आहेस; आम्ही नाही.’ “
साहस करणे कुणालाच पटले नाही. म्हणून तो आगळा-वेगळा कोंबडा एकटाच निघाला. कोंडीबाच्या घरापासून थोडासाच दूर गेला; आणि नको घडायला, तेच घडले.
कोंडीबा काही वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गेला होता. तो परत फिरला, तेव्हा त्याला भर रस्त्यात हा आगळा-वेगळा कोंबडा दिसला. ‘इथे हा चुकून आलेला दिसतोय’, असे त्याला वाटले; म्हणून त्याने कोंबड्यास पकडले, घरी आणून सोडले आणि मग तो आपल्या कामास लागला.
कोंडीबा सतत काम करीत होता; म्हणून त्याचे लक्ष त्या आगळ्या-वेगळ्या कोंबड्याकडे नव्हते. म्हणून त्या कोंबड्याने काय केले ? तो तिथून निसटला. लपत-छपत, हळूहळू पुढे जाऊ लागला. तो बराच दूर गेला. गावाच्या वेशीवर आला. आनंदला आणि कुकुच्चकूऽऽऽ ओरडत नाचू लागला.
कोंबडा ऐटीत चालू लागला. आनंदाच्या भरात ऐटीत चालू लागला. पुढे-पुढे जाऊ लागला, मध्येच थांबू लागला आणि इकडे- तिकडे पाहू लागला.
त्याला वेगवेगळे पक्षी दिसू लागले. त्यांची किलबिल त्याला भावली. गायी-म्हशी चरत होत्या. त्या एकदम बिंधास्त होत्या. गाढवं उकिरडा हुंगत होती. जे काही खाद्य दिसेल, ते खात होती. मध्येच ‘ट्यां-हो- हाई’ गात होती. डुकरे तिथेच लोळत होती. एकमेकांशी खेळत होती.
पक्ष्यांना, गायी-म्हशींना, गाढवांना, डुकरांना कोंबड्याने ‘हाय’ केले. ‘मी तुमचा मित्र, तुम्ही माझे मित्र’ म्हटले.
कुकुच्चकू करत कोंबडा म्हणाला, ‘मला नवा परिसर पहायला मिळाला. वेगळी हवा अनुभवायला मिळाली. नवे मित्रही मिळाले. मी धाडसी आहे. मी खुष झालो आहे.
कोंबडा खुष झाल्याचा परिणाम काय झाला ? त्याने आणखी पुढे जाण्याचे ठरविले. आणि तो खरोखरच पुढे-पुढे जाऊ लागला; आणि पुष्कळ दूर गेलाही.
तिथे चहूबाजूंस ओसाड जमीन ! पक्षी-प्राणी गायब ! असा एकटेपणा त्याला आवडला नाही. तो जरा भ्यालादेखील. अशात त्याने दूरवर एक माणूस पाहिला.
माणसाला पाहताच कोंबडा म्हणाला, “वा, छान ! आपल्याला माणसाची सोबत मिळाली. “
थोड्याच वेळात तो माणूस जवळ आला, थांबला, निरखून पाहू लागला, हात चोळू लागला, तेव्हा मात्र कोंबडा भ्याला. मनात म्हणाला, “हा माणूस बहुतेक चोर असावा. मला पकडेल. घेऊन जाईल. बापरे !” पकडून
आणि खरंच की ! कोंबड्याला पकडण्यासाठी त्या माणसाने हात पुढे केलाच. आणि कोंबडा सावध झाला.
त्या माणसाने कोंबड्याला पकडण्याचा प्रयत्न केला; पण कोंबडा लगेच दूर झाला. नंतर तो माणूस कोंबड्याला पकडण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करू लागला. पण कोंबडा सावध होता, चपळ होता, शिताफीने झुकांड्या देत होता; म्हणून पकडला जात नव्हता.
अशी पकडा-पकडी थोडा वेळ चालली; आणि जे घडायला नको, तेच घडले. त्या माणसाला यश आले. त्याने कोंबड्याला पकडलेच !
पण कोंबडाही काही कमी नव्हता. तो जोरदार आवाजात कुकुच्चकू ऽऽऽ ओरडू लागला, पंख जोरात फडफडवू लागला, चोचीने खूप टोचू लागला आणि पायांच्या नखांनी त्या माणसाला इजा करू लागला.
कोंबड्याची ही दंगा-मस्ती त्या माणसाला सहन झाली नाही; म्हणून नाइलाजाने त्याने कोंबड्यास सोडून दिले. लागलीच कोंबडा जोरात धावत दूर पळाला आणि वाचला.
धावत-धावत कोंबडा पुष्कळ दूर गेला, थांबला आणि आराम करीत बसला. मग तो समाधानाने म्हणाला, ‘त्या वाईट माणसाच्या तावडीतून आपण सहीसलामत सुटलो. आता कसे छान वाटते.”
आता तो कोंबडा इकडे-तिकडे ऐटीत पहात होता. विश्वासाने चालत पुढे-पुढे जात होता. मध्येच त्याला संशय आला; आणि म्हणून तो थांबला. लक्ष देऊन ऐकू लागला.
आणि त्याचा संशय खरा ठरलाच ! दुरून ‘कुई कुई’ आवाज येत होता. ती कोल्हेकुई होती. हळूहळू कोल्हेकुईचा जोर वाढतच होता. याचा अर्थ काय ?
कोंबड्याला अंदाज आला की आपला शत्रू कोल्हा आपल्याच दिशेने येत असणार! म्हणून कोंबडा फार घाबरला, जवळच्या झाडाआड लपला, थरथर कापू लागला. त्याचे ऐटदार चालणे थांबले. कुकुच्चकूही थांबले.
कोंबड्याचा अंदाज खरा ठरला. कोल्हा कोंबड्याच्या दिशेने धावत येत होता. कोंबड्याची खात्री झाली, आपण मोठ्या संकटात सापडलोय ! कोल्हा आपल्याला मारून टाकणार आणि खाणार !
पण हा कोंबडा होता हटके ! आगळा-वेगळा ! त्याने आपल्या मनाला पटविले, ‘घाबरून कसं चालेल? आपण हुशार आहोत. युक्तिवाण आहोत. हुशारी वापरू, युक्ती शोधू; मग ती वापरू. अखेरीस संकटातून सही सलामत सुटू.
असा विचार केल्यावर त्याला बरे वाटले. मन शांत झाले. नंतर जरा खोलवर विचार केला; आणि त्याला युक्ती सुचली. ती संकटातून सुटण्यासाठी अगदी योग्य आहे, याची त्याला खात्री पटली.
म्हणून कोंबडा आनंदला. झाडाआडून बाहेर आला. कुकुच्चकू गात नाचूही लागला. एवढ्यात कोल्हा कोंबड्याजवळ आलाच. आणि कोंबड्याने आपल्याला सुचलेली युक्ती वापरायला सुरुवात केली. कोंबडा आनंदात आहे, गातो आहे, नाचतो आहे, तो आपल्याला भीत नाही, हे पाहून कोल्हा जरा विचारातच पडला. मनात म्हणाला, “हा कोंबडा अजब आहे !”
नंतर कोल्ह्याने विचारले, “कोंबडेमित्रा, मी कोल्होबा आलोय ! तरी तू मजेत ? तुला माझी भीती नाही वाटत ?”
कोंबडा गायचा – नाचायचा थांबला. म्हणाला, ‘कोल्हेदादा, मला तुमची भीती मुळीच नाही वाटत. उलट मी तुमचं स्वागतच करतो. कारण की, मी तुमचीच वाट पहात होतो. खरंच वेलकम् ! सुस्वागतम् !”
” पण हे स्वागत का ?” असा प्रश्न कोल्ह्याने केला. त्यावर कोंबडा उत्तरला, “या जीवनाला अगदी कंटाळलोय मी. मला मरावंसंच वाटतंय. अगदी मनापासून सांगतोय मी.”
‘कोंबड्याला अगदी मनापासून मरावंसं वाटतंय’, हे ऐकून कोल्हा फार आनंदला. त्याने विचारले, “म्हणजे कोंबडेमित्रा, मी तुला मारून टाकावं ! खावं ! असंच तू सुचवतोय ना ?”
“होय कोल्होबा ! मला खरंच मारून टाका ! खाऊन टाका ! मी एकदाचा सुटेन ! आणि हे उत्तम काम केल्याचं तुम्हाला खूप पुण्य मिळेल.”
‘जशी तुझी इच्छा ! मी तुला खायला तयार आहे.” कोल्हा खोट्या रडक्या सुरात, पण जिभल्या चाटत म्हणाला.
कोंबडा हे सावज आनंदाने मरायला तयार आहे; म्हणून कोल्हा विशेष खूष होता. अशा वेळी तो काहीही कबूल करेल, असे कोंबड्याला वाटले. म्हणून कोंबड्याने विचारले, “कोल्हेदादा, मरण्याआधी माझ्या दोन इच्छा आहेत. त्या पूर्ण कराल ?”
“हो. तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण करीन !” कोल्हा लगेच उत्तरला.
“मी तुझ्या दोन इच्छा पूर्ण करायला तयार आहे. मी तुला मारून खायला तयार आहे. पण मला कळत नाही, की तुला मरावंसं का वाटतं ?” हे ऐकून कोंबडा समजावून सांगू लागला, “माझा मालक कोंडीबा. तो बेलगावात रहातो. कुक्कुटपालनाचा धंदा करतो. त्याच्या ताबेदारीत रहायला मला मुळीच आवडत नाही. मी अगदी कंटाळलोय. म्हणून मला जीव नकोसा झालाय. ‘ “
“हे तुझं म्हणणं पटलं. पण काय रे, तुला मारून खायला मीच का ?” असा कोल्ह्याने प्रश्न केला. तेव्हा कोंबडा उत्तरला, ‘कोल्हेदादा, कोंडीबाच्या ताबेदारीतून मी सटकलो. गावाच्या वेशीवर आलो. एवढा पुढेही आलो. तू दूरवर पहा. तिथे गरीब गायी दिसतील. आळशी म्हशी दिसतील. मूर्ख गाढवं दिसतील. नेभळट डुकरं दिसतील. असे प्राणी मला भेटले. ते मला मारून काय खाणार ? म्हणून तू भेटलास, तेव्हा मी आनंदलो. कारण तू मला खाऊ शकशील ! खरं ना ?”
‘हो; अगदी खरं !” कोल्हा उद्गारला.
कोंबड्याला मारून खायला कोल्हा उतावीळ झाला. म्हणाला, “तुझ्या दोन इच्छा मी पूर्ण करतो. चल, सांग पहिली इच्छा.” “पोटभर खावं, ही माझी पहिली इच्छा. मी केव्हाचा भुकेला आहे,” कोंबड्याने असे सांगताच कोल्हा म्हणाला, “इकडे येताना वाटेत मी एक सुटलेली पुडी पाहिली. त्यात खाण्याचे पदार्थ होते. चल, आपण ती पुडी पडली आहे, तिथे जाऊ. मिळेल. ” तुला पोटभर खायला
‘पण कोल्होबा, मी बेलगावाहून इथपर्यंत आलोय ! खूप थकलोय !” असे कोंबड्याने म्हणताच कोल्हा दुजोरा देत म्हणाला, ‘तर मग बस माझ्या पाठीवर !” आणि मग काय झाले ?
कोंबडा कोल्ह्याच्या पाठीवर बसला. दोघे त्या खाऊच्या पुडीजवळ आले. तेव्हा कोल्ह्यावर स्वार झालेला कोंबडा खाली उतरला. पुडीतले पदार्थ त्याने भरपूर खाल्ले. पहिली इच्छा पूर्ण झाली; म्हणून त्याला समाधान वाटले. त्याने कोल्ह्याचे भरपूर आभार मानले.कोंबड्याची पहिली इच्छा पूर्ण केल्यावर कोल्ह्याने त्याची दुसरी इच्छा विचारली आणि कोंबडा लगेच म्हणाला, “कोल्हेदादा,
तुमचं गायन ऐकावं, ते ऐकून आनंदित व्हावं; आणि मग सुखाने मरावं, अशी आहे माझी दुसरी इच्छा. “एवढंच ना ! अरे ऐक ! माझं गाणं ऐक ! ‘कुई कुई’ राग ऐक !” असे म्हणून कोल्हा खरोखरच गाऊ लागला,
” कुईऽऽऽ कुईऽऽऽ कोल्हेकुई
कुई कुई कोल्हे माSSS गातोय मी, कोल्हेकुई नी गरे प मा sss”
कोल्ह्याचे हे गायन ऐकताना कोंबडा आनंदला. मनात म्हणाला, “कोल्हा गातोय म्हणजे, म्हणजे केवळ बोंबाबोंब करतोय. ही बोंबाबोंब ऐकून ह्याचा शत्रू कुत्रा येईल, मग दोघं भांडू लागतील, भांडणात रंगतील; आणि तेव्हा मी हळूच पळून जाईन आणि जिवानिशी वाचीन. माझी युक्ती सफल होईल.”
आणि खरोखरीच कोंबड्याच्या युक्तीमुळे कोल्हा संकटात सापडला. कसा ते पाहाच !
कोल्ह्याचे  गायन ऐकत आला एक कुत्रा धावत !
कुत्र्यास पाहून कळले कोल्ह्याला
कोंबड्याने युक्ती योजून फसविले आपल्याला !
कुत्रा – कोल्हा एकमेकांचे वैरी !
एकमेकांना बघताच शब्दांच्या फैरी !
शब्दांच्या फैरींची झाली कमाल
दोघेही चिडले, डोळे झाले लाल !
कुत्र्याने कोल्ह्यावर केला हल्ला बोल !
कोल्हाही शूर, तोही करी हल्ला बोल !
आता दोघांची लढाई जुंपली !
कोंबड्याने त्यांची वाहवा केली !
नंतर कोल्हा – कुत्रा लढण्यात दंग
कोंबडा म्हणे मनात, हा खरा जंग !
कोल्होबा – कुत्रोबा होते लढत
कोंबडा निघाला दोघांच्या नकळत !
कुत्रा, कोल्हा कुणीच नव्हते हारत
कोंबडा धूम पळे फड्फड्फड् उडत !
माझी युक्ती सफल, कोल्हाच फसला ! मी आहे सलामत, कोंबडा हासत म्हणाला ! कोंडिबाच्या घरी, पोहोचला कोंबडा ! कुकुच्चकू गात, नाचे डिंगडा डिंगडा ! कोंबड्यांना, पिल्लांना घडले ते सांगितले कोंबडा म्हणे आज जिवावरचे संकट गेले ! कोंबडा सांगे साहस केले म्हणून संकट आले पण मी युक्ती वापरली,
म्हणूनच संकट टळले !

दुष्टाला मदत नको

एका धष्टपुष्ट आणि लबाड लांडग्यामागं एक धनगर लागला होता. त्याच्या कळपातल्या कोकरांना तो लांडगा त्रास देत असे. लांडगा पुढं आणि धनगर मागं असं ते दोघं पळत होते. पळता पळता एका आडोशाला त्या लांडग्याला एक कोकरू दिसलं.
लांडग्यानं त्या कोकराला दटावलं, डोळ्यांनी भीती दाखवली आणि त्याच्यापुढे ऐटबाज मल्लासारखा उभा राहून तो म्हणाला, “ए कोकऱ्या, मी काय सांगतो ते नीट ऐक. माझ्यामागं धनगर लागलाय. मी या झुडपात लपतो. तो तुला विचारील लांडगा कुठं गेला, तेव्हा तू त्याला सांग ‘लांडगा दुसऱ्या रस्त्यानं गेला.’ याद राख, मी इथं लपलो आहे हे त्या धनगराला अजिबात सांगू नकोस. तू माझं ऐकलंस, तर मी तुला बक्षीस देईन.”
गरीब बिचाऱ्या कोकारानं मान हलवली. लांडगा झुडपात लपला. इतक्यात धनगर तिथं आला. त्यानं कोकराला विचारलं, “लांडगा पाहिलास का?” कोकरू म्हणालं, “मालक, लांडगा त्या बाजूने गेला. मी त्याला पाहिलं. इथं नाही आला तो.’
कोकरानं दाखवलेल्या मार्गानं धनगर धावू लागला. थोड्या वेळानं झुडपात लपलेला लांडगा ऐटीत बाहेर आला.
लांडग्याला पाहून कोकरू म्हणालं, “लांडगेदादा, तुम्ही माझ्यामुळे वाचलात, आता मला माझं बक्षीस द्या. “
“अरे बाबा, माझ्या हातात सापडूनही मी तुला खात नाही. हेच तुझं बक्षीस नाही का? जा आता! मीही पळतो इथून!”
लांडगा पळून गेला. कोकरू मनात म्हणालं, “देवाची कृपा म्हणून मी वाचलो. हे लबाड लांडगे असेच असतात. आपल्या ताकदीच्या जोरावर ते माझ्यासारख्या गरीब प्राण्यांवर सत्ता गाजवतात. खरं तर मी त्याला मदत करायला नको होती. कधीतरी तो आपल्याला किंवा इतर कोकरांना त्रास देणारच! दुष्टांना मदत करणं चुकीचं आहे.’

वटवाघळाची चतुराई

एका कुरणामध्ये दोन मांजरी राहत होत्या. दोघीही एकमेकींशी गोडीनं वागत होत्या. एक मांजर फक्त उंदीर-घुशी मारून खायची, तर दुसरी मांजर फक्त पक्षी पकडून खायची.
एकदा काय झालं, पहिल्या मांजरीच्या हाताला एक वटवाघूळ लागलं. तिला ते उंदीर-घुशीसारखंच वाटलं.
त्या वटवाघळाला ती मारणार, तोच त्यानं आपले पंख उघडले आणि तो म्हणाला, “मनी मावशी, तू फक्त उंदीर-घुशीच खातेस ना? मग मला कशाला पकडलंस. मी पक्षी आहे. हे बघ माझे पंख. “
मांजर वटवाघळाच्या पंखांकडे आश्चर्यानं पाहत राहिली. ती म्हणाली, “अरेच्चा, हा उंदीर नाही!” आणि तिनं त्या वटवाघळाला सोडून दिलं. वटवाघूळ झाडाच्या फांदीला टांगून झोके घेऊ लागलं.
दुसऱ्या दिवशी तेच वटवाघूळ दुसऱ्या मांजरीच्या हाती लागलं. ती त्याला पक्षी समजून मारणार होती तोच आपलं अंग घुसळत वटवाघूळ म्हणालं, “मनी मावशी, फक्त पक्षीच खातेस ना ! मी पक्षी नाही. बघ माझ्या अंगावर एक तरी पीस आहे का ?”
मांजरीनं वटवाघळाचं अंग चाचपून पाहिलं परंतु तिच्या हाताला त्याची मऊमऊ कातडी लागत होती. ती म्हणाली, “नाही रे बाबा, मी नाही तुला खाणार! तुझं अंग उंदरासारखं आहे.” असं म्हणून तिनं त्याला चटकन सोडून दिलं. मांजरीनं सोडल्याबरोबर वटवाघूळ उडत उडत झाडावर गेलं आणि फांदीला लटकून झोके घेऊ लागलं.
“चला, आपण दोन्ही मांजरींच्या तावडीतून सुटलो!” असं म्हणत मोठा निःश्वास सोडून ते झोके घेऊ लागलं.

माकडाचे काळीज

एका सरोवरात एक सुसर राहत होती. सरोवराच्या काठावर एक झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. सुसरीला पोहताना पाहून, माकडाला सरोवरात फिरावे असे वाटे. सुसरीला माकडे छान छान फळे खाताना पाहून फळे खावीशी वाटे. हळूहळू त्या दोघांची मैत्री झाली. माकड सुसरीला म्हणाले, “सुसरताई मला सरोवरात फिरवून आणशील का ?” सुसर म्हणाली, “हो! बस माझ्या पाठीवर.” टुणकन उडी मारून माकड सुसरीच्या पाठीवर बसले.
सुसर माकडास घेऊन फिरावयास निघाली. सुसरीच्या मनात विचार आला, हे माकड रोज गोड-गोड फळे खाते, तर ह्याचे काळीज किती गोड असेल! सुसरीने माकडास विचारले, “तू मला तुझे काळीज देशील का?” माकड सावध झाले आणि म्हणाले, “मला आधी का नाही विचारलेस, मी तर काळीज झाडावरच ठेऊन आलो. चल, मला किनाऱ्यावर सोड म्हणजे तुला काळीज काढून देतो.” सुसर त्याला घेऊन किनाऱ्यापाशी आली. माकडाने टुणकन उडी मारली आणि झाडावर चढून बसले. सुसर बिचारी काळीज मिळण्याची वाट पहात राहिली.
बोध :- मैत्री करताना सावध रहावे.
हे देखील वाचा :
अधिक नवीन माहिती साठी आमच्या Telegram
ग्रूप ला Join व्हा.
Telegram 👇👇👇
आम्हाला  Follow  करा.  👇👇👇👇
 
Telegram          : https://t.me/+H9CutnnkwVswNzk1
Scroll to Top