पायाच्या चवड्यापासून नाभीपर्यंतचा शरीराचा भाग जमिनीवर टेकून कमरेपासून मस्तकापर्यंतचा भाग पाठीच्या स्नायूंच्या बळावर वर उचलला जाऊन उचललेला शरीराचा भाग नागाच्या फण्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनास ‘भुजंगासन’ असे म्हणतात.
कृती :
पालथे झोपावे, दोन्ही हात शरीराच्या बाजूस ठेवावे, पाय एकमेकांजवळ प्रथम दोन्ही पायांचे गुडघे व दोन्ही टाचा व पायांचे दोन्ही चवडे एकमेकांजवळ ठेवावे. दोन्ही हात कोपरात दुमडून हाताचे तळवे छातीच्या दोन्ही बाजूंना ठेवा. नंतर कपाळ पुढे घेऊन नाकाने जमिनीस स्पर्श करील अशी स्थिती करा. हनुवटी शक्य तिकी पुढे नेऊन न्यावी. मानेचे स्नायू आकुंचित करून मस्तक वर व मागे न्यावे. खांदे मागे नेऊन खांद्यांची हाडे एकमेकांजवळ आणावीत. ही अंतिम स्थिती आपल्या क्षमतेनुसार ठेवा. मन श्वासावर स्थिर ठेवा.
श्वास स्थिती :
सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालू ठेवा.
सूचना :
हातांचा वापर कटाक्षाने टाळावा. बुबुळे व भुवया (नजर) समोर ठेवा.
फायदे :
1) पोटाच्या व छातीच्या स्नायूंवर ताण पडून त्यांचा लवचिकपणा वाढतो व श्वसन, पचन व उत्सर्जन क्रिया सुधारते.
2) श्वसन क्षमता सुधारते.
3) कंठ ग्रंथींचे आरोग्य वाढते.
4) आतड्यांचे विकार नाहीसे होतात.
5) पाठीच्या कप्प्याची लवचीकपणा वाढतो.
6) कण्याचे दोष नाहीसे होण्यास मदत होते.
वेळ : 30 सेकंद
शलभासन
शलभ म्हणजे टोळ होय. या आसनातील शारीरिक आकृतिबंध हा जमिनीवर बसलेल्या टोळा च्या शेपटीप्रमाणे मागील भाग वर उचललेला असतो. म्हणून या आसनास शलभासन म्हणतात.
कृती :
छातीवर झोपावे. हात शरीराच्या बाजूला. चेहरा एका बाजूस, पाय सुखावह स्थितीत एकमेकांजवळ ठेवा. प्रथम दोन्ही गुडघे, टाचा, चवडे एकमेकांजवळ ठेवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना मांड्यांना लागून ठेवा. हाताच्या मुठी अलगद वळून त्या वरच्या बाजूस तोंड करून ठेवा. हनुवटी जमिनीला टेकवा. कमरेचे व पार्श्वभागाचे स्नायू आकुंचित करून त्यांच्या बळावर दोन्ही पाय वर न्या. मन श्वासावर स्थिर करा.
श्वास स्थिती : सामान्य व नैसर्गिक
फायदे :
1) कंबरेचे स्नायू दृढ होतात.
2) उदरावर येणाऱ्या आंतरिक दाबामुळे पोटाचे आरोग्य सुधारते.
3) कोठ्याची ताणस्थिती सुधारून मलावरोध दूर होण्यास मदत होते.
4) अपचन, गॅस इ. तक्रारी नाहीशा होतात.
वेळ : 30 सेकंद
धनुरासन
या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीर बंध धनुष्याप्रमाणे तर घोट्यांस धरलेले पाय व गुडघ्याखालील पाय खेचलेल्या दोरीप्रमाणे दिसतात यामुळे या आसनास ‘धनुरासन’ असे म्हणतात.
कृती :
पालते झोपा, कपाळ जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवा. तळहात वरच्या बाजूस तोंड करून दोन्ही हात शरीराच्या दोन्ही बाजूंस शरीरालगत ठेवा. गुडघ्यापासून पाय दुमडा. टाचा पार्श्वभागाच्या जवळ राहतील असे पाय ठेवा. मस्तक वर उचला व हनुवटी जमिनीवर ठेवा. दोन्ही पायांचे घोटे हातांनी धरा. शरीर शिथिल ठेवून पाय मागे नेण्यास सुरुवात करा. पाय मागे नेत असताना हाताच्या पायावरील पक्क्या पकडीमुळे हात मागे ओढले जातील व हातापायांना ताण निर्माण होईल. शरीरास वरच्या बाजूने ओढ मिळेल. शरीराचा सर्व भार पोटावर येईल ती धनुरासनाची अंतिम स्थिती होय.
श्वास स्थिती :
श्वास कोंढू नका, श्वास चालू राहील याची खबरदारी घ्या.
फायदे :
1) मेरुदंड लवचिक होतात.
2) पाठीचे दोश (वक्रता) नष्ट होतात.
3) कण्याचे स्नायूबंध लवचिक व दृढ होतात.
4) कमरेची व मानेची दुखणी नाहीशी होतात.
5) छातीचे स्नायू ताणल्यामुळे छातीचे आकुंचन प्रसरण सुलभ होते व श्वसन सुधारते.
6) पचनसंस्था व उत्सर्जनसंस्थांचे कार्य सुलभ होते.
7) अपचन, मलावरोध इ. तक्रारी नष्ट होण्यास मदत होते.
वेळ : 10-30 सेकंद
नौकासन
या आसनात शरीराचा आकृतिबंध नौकेप्रमाणे तयार होतो म्हणून या आसनास नौकासन असे संबोधले जाते.
कृती :
प्रथम पालथे झोपून रहा. टाचा, चवडे व गुडघे एकमेकांना लावून दोन्ही पाय सरळ ठेवा. हात शरीरालगत व तळहात वर ठेवा. हाताची बोटे व अंगठा एकमेकांजवळ ठेवा. कपाळ जमिनीला टेकवा.
नंतर हात हळूहळू वर उचला; कोपरात दुमडून छातीच्या दोन्ही बाजूंनी डोळ्याच्या बाजूस पुढे न्या व डोक्यापुढे सरळ ठेवा. नंतर कंबर, पाठ, मान, पार्श्वभाग व निबंध येथील स्नायू आंकुचित करण्यास सुरुवात करा. जांघेपासून पायाच्या चवड्यापर्यंतचा भाग व फांसळ्या पासून हाताच्या बोटापर्यंत शरीराचा वरचा भाग वर येऊ द्या. योग्य स्थिती साधली गेली की शरीरास नौकेप्रमाणे आकार येईल ही आसनाची अंतिम स्थिती होय.
श्वास स्थिती :
श्वास रोखून धरू नये. प्रारंभापासून श्वास चालू ठेवावा.
फायदे :
1) पोटावरील मेद कमी होऊन पोट कमी होण्यास मदत होते.
2) पोटाचे आरोग्य सुधारते.
3) अपचन, गॅस, मलावरोध इ. तक्रारींवर उत्तम उपाय,
4) कंबर, पाठ, मान व पार्श्वभाग यांच्या स्नायूंचे आकुंचन होत असल्याने हे सर्व स्नायू बलवान होतात.
5) कंबरदुखी, पाठदुखी नष्ट होण्यास मदत होते.
6) पाठीच्या कण्याचे आरोग्य वाढते, कणा बळकट होतो.
वेळ : 10 – 30 सेकंद
मत्स्यासन
या आसनस्थितीत माशाप्रमाणे सहजपणे पाण्यावर तरंगत राहता येते. म्हणून या शरीरिक आकृतिबंधास ‘मत्स्यासन’ असे म्हणतात.
कृती :
प्रथम पाय पसरून बसा. पद्मासन स्थितीत बसा. दोन्ही हात मागील बाजूस जमिनीवर ठेवा. प्रथम एका बाजूस वाकून त्या बाजूचे कोपर जमिनीवर ठेवा. नंतर दुसऱ्या बाजूस वाकून त्या बाजूचे कोपर जमिनीवर ठेवा. हळूहळू दोन्ही हात मांड्यांच्या दिशेने पुढे न्या व सावकाश मस्तक व पाठ जमिनीवर टेकवा. नंतर हातांच्या साहाय्याने जोर देऊन मस्तक पाठीमागे कमान करून जमिनीवर ठेवा. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडा. कोपर जमिनीस टेकून राहतील व शरीराचा भार त्यांवर पडणार नाही याची काळजी घ्या. प्राणधारणा करा व अशाप्रकारे मत्स्यासनाची अंतिम स्थिती साधा.
श्वास स्थिती :
नेहमीप्रमाणे चालू ठेवा.
फायदे :
1) मानेचे सर्व स्नायू दृढ व गळ्याचे स्नायू बनतात. लवचिक
2) पाठीचा कणा बळकट होतो, मान दुखीचा संभाव्य त्रास टाळता येतो.
3) छातीचे स्नायू लवचिक बनतात.
4) श्वसनक्षमता वाढते.
5) दम्यावर उत्कृष्ट उपचार.
वेळ : 10 ते 30 सेकंद
हलासन
या आसनातील शारीरिक आकृतीबंध नांगराच्या आकाराप्रमाणे भासत असल्याने या आसनास हलासन असे म्हणतात.
कृती :
उताने झोपा, दोन्ही पायांच्या टाचा, चवडे, घोटे व गुडघे एकमेकांजवळ घ्या, हात शरीराच्या बाजूस घ्या. हातांचे तळवे. जमिनीवर ठेवून मांड्याजवळ ठेवा. तदनंतर दोन्ही पाय सावकाश वर उचला व मस्तकाच्या दिशेने न्या. पार्श्वभाग वर उचला. पाय मस्तकाकडे अधिक झुकवा. ही कृती सावकाश करा. पाय जमिनीकडे झुकवा. कंबर, पोट, जांघ इ. च्या सांध्यांचे स्नायू संपूर्ण ढिले करावेत. म्हणजे पाय जमिनीकडे संपूर्ण खाली जातील व चवडे जमिनीस लागतील. पाय ताठ ठेवून गुडघे जेवढे मस्तकापर्यंत आणता येतील तेवढे आणा नंतर पाय जास्तीत जास्त मस्तकापासून मागे न्या. जेणेकरून मानेवर ताण येऊन शरीराचे ओझे मानेवर जाणवेल. हनुवटी छातीजवळ येईल. दोन्ही हात मागे न्या व बोटे एकमेकांत गुंफून तळहात मस्तकामागे ठेवा. ही हलासनाची अंतिम स्थिती होय. (पायांना झटके देण्याचे टाळा. )
श्वास स्थिती :
सहज व नैसर्गिक श्वासस्थिती ठेवा..
फायदे :
1) मेरुदंड लवचिक बनतो.
2) पोटाचे नळ बळकट बनतात, पोटाचे आरोग्य सुधारते.
3) पाठीच्या कण्याला बाक मिळून मणके ताणले जातात.
4) मधुमेह या व्याधीवर उत्तम उपचार.
वेळ : 30 सेकंद
पवन मुक्तासन
कृती :
उताणे झोपा. दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवा. हात शरीरालगत दोन्ही बाजूंना ठेवा. तळहात जमिनीकडे करून ठेवा. हळूहळू दोन्ही पाय वर उचला व गुडघ्यात दुमडा. दुमडलेले गुडघे छातीजवळ घ्या. दोंन्ही हातांनी गुडघ्या स विळखा घाला. दोन्ही हातांनी दोंन्ही हातांचे कोपर पकडून गुडघे छातीवर दाबा. हळूहळू मस्तक वर उचला व हनुवटीने गुडघ्यांना स्पर्श करा. प्राणधारणा करा ही पवन मुक्तासनाची अंतिम स्थिती होय.
श्वास स्थिती :
नैसर्गिक व सामान्य
फायदे :
1) ‘गॅस’ च्या त्रासापासून मुक्ती मिळते.
2) पचन व उत्सर्जन कार्य व्यवस्थित होतात.
3) पोटाचे आरोग्य वाढते.
वेळ : 30 सेकंद
वक्रासन
कृती :
पाय पसरून बसा. हात दोन्ही बाजूंस तळहात जमिनीकडे करून बसा. दोंन्ही टाचा, चवडे, गुडघे, एकमेकांजवळ आणा. पाय ताठ ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवून हात शरीराच्या दोन्ही बाजूस ठेवा.
उजवा पाय गुडघ्यात दुमडा व दुमडलेला गुडघा छातीच्या बाजूस येऊ द्या. उजवा पाय अशा रीतीने डाव्या गुडघ्याजवळ ठेवा की ज्यामुळे उजव्या पावलाचा चवडा व टाच यांच्या मध्यभागी डाव्या पायाचा गुडघा येईल. नंतर उजव्या हाताने उजव्यापायाचा दुमडलेला गुडघा किंचित डाव्या बाजूस न्या. कमरेपासून वरील भाग उजव्या बाजूस वक्र करा. डावा खांदा उजव्या पायाच्या दुमडलेल्या गुडघ्याजवळ आणा. आणखी उजवीकडे वळून डाव्या हाताच्या बगलेत उजवा गुडघा घेत असताना उजव्या हाताचा आधार घ्या. उजवा गुडघा बगलेत घट्ट बसविल्यानंतर उजवा हात उजव्या बाजूने मागे न्या. व जमिनीवर ठेवा नंतर डावा हात गुडघ्या वरील पकड घट्ट करून जमिनीवर ठेवा. व मान वळवून चेहरा उजव्या बाजूने मागे नेण्याचा प्रयत्न करा. व कमरेपासून मस्तकापर्यंतचा भाग उजवीकडे वक्र करा. डोळ्याची बुबळे उजव्या कोपऱ्यान न्या, हनुवटी उजव्या खांद्याकडे न्या. पाठीचा कणा ताठ करा. ही एका बाजूची वक्रासनाची अंतिम स्थीती.
हीच उलट क्रिया दुसऱ्या बाजूची वक्रासनाची अंतिम स्थिती समजावी.
श्वास स्थिती :
श्वासोच्छास चालू ठेवा.
फायदे :
1) छाती, पोट, पाठ व पाठीचा कणा यांचे स्नायू लवचिक व बळकट बनतात.
2) अपचन, मलावरोध, गॅसेस इ. तक्रारींवर उपाय होतो
3) लैंगिक ग्रंथी कार्यक्षम होतात.
4) श्वसणक्रिया सहजसुलभ होते.
5) मानेचे ज्ञानतंतू कार्यक्षम बनतात,
वेळ : 30 सेकंद
ताडासन
ताडाच्या झाडाप्रमाणे या आसनातील शारीरिक आकृतिबंध तयार होतो. म्हणून यास ‘ताडासन’ असे म्हणतात.
कृती :
सरळ उभे रहा. टाचा, गुडघे, एकमेकांजवळ ठेवा. चवडे हातांची बोटे एकमेकांजवळ ठेवा. तळहात मांड्याच्या बाजूंना ठेवा. दोन्ही हात तळहात जमिनीकडे करा व खांद्यांच्या रेषेत एकमेकांना समांतर येतील अशा रीतीने हळूहळू वर न्या. हातांची वर जाण्याची गती तशीच ठेऊन त्यांच्या बरोबरच टाचाही वर वर उचलीत न्या. हात वर न्या व पायांच्या उभ्या रेषेत स्थिर करा. बाहू कानांजवळ येऊ द्या. तळहात समोर करा, खांदे, कोपर व मनगटे यांच्यात हात वाकू देऊ नये. दोन्ही तळहातांमध्ये छाती इतके अंतर ठेवा. टाचा एकमेकांना चिटकून ठेवून आपल्या क्षमतेप्रमाणे वर जाऊ द्या. शरीराचे ओझे चवड्यावर येईल. सर्व शरीराला आपण वर खेचत असल्याप्रमाणे ताण द्या. ही ताडासनाची अंतिम स्थिती होय.
श्वास स्थिती :
नेहमीप्रमाणे साधारण..
फायदे :
1) शरीरातील आळस झटकून ताजेतवाने वाटते.
2) पायांतील रक्तवाहिन्यांचे काम सुधारते.
3) तोलनक्षमता (शरीराची) वाढते.
4) मणक्यांमधील कुर्चांचे आरोग्य सुधारते.
5) मणक्यांमधील रक्ताभिसरण सुधारते.
6) उंची वाढण्यास मदत होते.
वेळ : यथाशक्ती
मयुरासन
या आसनाचा अंतिम शारीरिक आकृतिबंध हा पिसारा न फुलवलेल्या मोराप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनास ‘मयुरासन’ असे म्हणतात.
कृती :
गुडघे जमिनीवर ठेवून चवड्यावर बसा, टाचा एकमेकांजवळ ठेवा. कमरेपासून पुढे वाका, दोन्ही हात एकमेकांजवळ आणा. हाताचे पंजे, मनगट व कोपर एकमेकांना चिटकून ठेवा. हातांची बोटे पावलांच्या दिशेकडे करून दोन्ही मांड्यांमधून हातांचे पंजे जमिनीवर ठेवा. शरीराचा कमरेपासूनचा वरचा भाग खाली झुकवा व हात कोपरात दुमडा दुमडलेले हाताचे कोपर नाभीवर घट्ट बसवा. नंतर सावकाश कपाळ जमिनीवर ठेवा व दोन्ही पाय एकेक करून मागे न्या. पाय मागे घेतल्यावर गुडघे, घोटे व चवडे एकमेकांजवळ चिकटून ठेवा. हाताचे पंजे व पायांचे चवडे जमिनीवर ठेवून त्यांच्या आधारावर मस्तक वर उचला व नंतर पाय गुडघ्यात ताठ ठेऊन शरीर कुठेही वाकू न देता हातांच्या आधाराने पुढे-पुढे न्या. शरीर पुढे नेत असताना पाय आपोआपच वर उचलले जातील. संपूर्ण शरीर जमिनीला समांतर व जमिनी पासून व येईल. सर्व शरीर केवळ हातांवर तोलले जाईल. शरीर स्थिर ठेवा. ही मयुरासनाची अंतिम स्थिती होय.
श्वास स्थिती :
श्वास जाणीवपूर्वक चालू ठेवा.
फायदे :
1) पचनक्रिया तीव्र व प्रभावशाली बनते.
2) पोटाचे स्नायू बलवान होतात.
3) हातांचे स्नायू व मनगटे बळकट बनतात.
4) शरीराची तोलन क्षमता वाढते
5) मूत्रपिंड कार्यक्षम बनते.
वेळ : १ ते ३ मिनिटे.
सर्वांगासन
कृती :
पाठीवर झोपा, हात मांड्याजवळ ठेवून चवडे, टाचा घोटे व गुडघा एकमेकांजवळ सरळ ठेवा. हाताचा आधार न घेता इतर स्नायूंच्या बळावर दोन्ही पाय सरळ ठेऊन हळूहळू वर न्या त्याच नियंत्रित वेगात पाय मस्तकाकडे झुकवा, पार्श्वभाग व कंबर उचलून पाय मस्तकाच्या मागे न्या. हात कोपरात वाकवून तळहात पाठीला लावा व तळहातांच्या साहाय्याने खांद्यापर्यंत पाठीचा भाग वर न्या व शरीराचा सर्व भार खांद्यावर येईल अशी शरीरस्थिती तयार करा. पाय सरळ ठेवा. हनुवटी छातीवरील पोकळीजवळ बसवा. शरीराचे ओझे मान व खांदे यांच्यावर येईल. ही सर्वांगासनाची अंतिम स्थिती होय.
श्वास स्थिती :
नैसर्गिक व नेहमीप्रमाणे चालू ठेवावी.
फायदे :
1) रक्ताभिसरन जलद होते.
2) पायाकडील अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे सहज येते.
3) लठ्ठपणा, खुरटेपणा, इ. दोष दूर होतात.
4) जननेद्रियांची वाढ चांगली होते.
5) अपचन, बद्धकोष्ठता दोष नाहीसे होतात व पचनसंस्था सुधारते.
6) मेंदूचे कार्य उत्तम चालते.
7) मंद स्मरणशक्ती, बुद्धीचा थकवा, व भावनांची निसृता व अस्थिरता या आसनामुळे नाहीशा होतात.
वेळ : 1/2 ते 1 मिनिटे
शीर्षासन
‘शीर्षासन महणजे आसनांचा राजा’ या आसनात केवळ मस्तकावर सर्व शरीराचा तोल संभाळला जातो म्हणून या आसनास ‘शीर्षासन’ असे म्हणता.
कृती :
चवडे व गुडघे जमिनीवर टेकून जमिनीवर बसा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफा, कोपरापर्यंचे हात जमिनीवर ठेवा. मस्तकाचा मध्याचा भाग हातांमुळे तयार झालेल्या कोनात बसवा. बोटांची गुंफन माध्याच्या मागील बाजूस नेऊन मध्यास आधार द्या, त्यावेळी हनुवटी छातीत घट्ट बसवा. मांड्या व पार्श्वभाग वर आना मस्तक व्यवस्थित बसल्यावर पाय सरळ करून पार्श्वभाग आणखी वर आना. पाय सरळ ठेवून केवळ टाचा वर मस्तकाच्या बाजूस पायावरचे शरीराचे ओझे मस्तकावर न्या. मांड्या जमिनीस समांतर ठेवा. नंतर गुडघे वर न्या. डोक्यापासून गुडघ्यापर्यंत शरीर जमिनीस लंब अशा रेषेन राखावे. शेवटी केवळ गुडघ्या पासून चवड्यापर्यंतचा भार वर उचलून सरळ करा. मान, कंबर व पाय सरळ रेषेत आणा. शरीराचा सर्व भार पाठीच्या बाजूस ताठ ठेवा हातावर भार देऊ नका. त्यांचा उपयोग फक्त तोलरक्षणासाठी करा. ही शीर्षासनाची अंतिम स्थिती होय.
श्वास स्थिती :
श्वासोच्छवास नैसर्गिकरीत्या चालू ठेवावा
फायदे :
1) कान, नाक, डोळे, जीभ इ. ज्ञानेंद्रिये व त्यांना नियंत्रण करणारी मेंदूतील केंद्रे अधिक कार्यक्षम बनतात.
2) अशक्तपणा, अतिनिद्रा, अपचन बद्ध कोष, मंदबुद्धी, डोके जड होणे, स्मरणशक्ती कमकुवत होणे इ. दोष नष्ट होण्यास मदत होते.
3) पोट, छाती व मेरुदंड यांना होणारा रक्तपुरवठा वाढतो
4) पचनसंस्था, उत्सर्जनसंस्था व मज्जासंस्था यांचे कार्य अधिक व्यवस्थित चालते.
5) मूळव्याध, भगंदर, अपचन, मलबद्धता इ. दोष नष्ट होतात.
6) कंठ, यकृत, प्लिहा यांतील रक्तसंचयामुळे होणारे दोष नाहीसे होतात.
7) नैसर्गिक रीतीने उंची वाढण्यास मदत होते. ८) दम्याच्या विकारावर उपयोगी
वेळ : 20 ते 60 सेकंद
शवासन
हे आसन चित्तविश्रांतिकारक आहे. तसेच ते सर्वश्रेष्ठ मानले जात. शवासन करणे म्हणजे मृत माणसाप्रमाणे शारीरिक आकृतिबंध तयार करणे होय. प्राणावर, नादावर, दृश्यावर, गंधावर, स्पर्शावर किंवा श्वासावर मनाची धारना करून त्यायोगे शरीर व मन यांना विश्रांती मिळवून देणे हे शवासनाचे तत्त्व आहे. मन प्रसन्न करणारे, असे हे आसन आहे.
कृती :
प्रथम पाठीवर झोपा. पायांत थोडे अंतर घ्या पायाचे चवडे बाहेरील बाजूस झुकवा हात शरीरापासून दूर ठेवा, गाढ झोपेत असताना जसा हात असतो त्या पद्धतीने हात ठेवा. बोटे अर्थवट मिटलेली ठेवा. सवइ प्रमाणे मान थोडी कोणत्याही बाजूस झुकवा. डोळे मिटा, बुबुळे निश्चल राखा. नंतर कल्पनाशक्ती व इच्छाशक्तीच्या आधाराने हात-पाय, लहान-मोठे स्नायू हे ढिले करा, हळूहळू मेंदू, हृदय, आतडी इ. शिथील करा.
प्रथम एका पायाच्या चवड्यापासून सुरुवात करा. इच्छाशक्तीने तो भाग शिथिल करा. नंतर हळूहळू एकएक अवयव शिथिल करत वर यावे चवडा, घोटा, पाटेरी, मांडीचे स्नायू, जांघ, हाताची बोटे, तळहात, मनगट, कोपर, खांदा यानंतर अनुक्रमे, पोट नाभी, छातीचा पिंजरा, हनुवटी ओठ, नाक, डोळे, कपाळ, टाळू या ठिकाणी मन घ्यावे व शिथिलता निर्माण करावी व शेवटी तेथून मन काढून घ्यावे व मृतवत् करावे.
तदनंतर श्वसनसंस्था छातीची हालचार निर्हेतूक करावी नैसर्गिक क्रिया होऊ द्यावी. तद्नंतर मेंदू, हृदय, आतडी, ग्रंथी इ. चे कार्य कमीत कमी, मानून आपला मनाचा त्याच्याशी कोणताही संबंध राहिला नाही अशी मानाची धारणा करावी व मन श्वासोच्छवासावर एकाग्र करावे…
म्हणजेच प्राणधारणा करावी. ही शवासनाची अंतिम स्थिती होय.
फायदे :
1) हमखास विश्रांतीमुळे मन व शरीर ताजेतवाने व कार्यक्षम बनते.
2) हृदय रोग, रक्तदाब, शारीरिक व मानसिक तणाव यांना प्रतिबंधक म्हणून उपयोगी.
3) ताणामुळे होणारा दृष्टिदोष सुधारतो.
4) निद्रानाशावर हमखास उपाय
वेळ : 5 ते 10 मिनिटे
हि पोस्ट तुम्हाला आवडी असल्यास नक्की कमेंट करा
आम्हाला Follow करा. 👇👇👇👇
हे देखील वाचा :
अधिक नवीन माहिती साठी आमच्या Telegram
ग्रूप ला Join व्हा.
Telegram 👇👇👇